Friday, 11 March 2011

मन : जन्माचो सोबती

नमस्कार मित्रहो !!!
मी लिंगूराम .

आजपासून मी आपल्या भेटीला येणार आहे .
मला माझे विचार लिहायला आणि आपले विचार वाचायला फार आवडतील .
कथा लिंगूरामाची , याद्वारे मी लिंगूरामचा जीवन प्रवास वर्णन करणार आहे .
आता तुम्हाला प्रश्न पडेल की हा लिंगूराम कोण ?



तर लिंगूराम हा कुणी प्रसिद्ध व्यक्ति नसून , एक साधेसरळ , तुमच्या आमच्यातले व्यक्तिमत्व आहे .
त्याच्या वाट्याला आलेले जीवन , त्याला पडलेले प्रश्न , हे कदाचित आपल्याही अनुभवास आले असतील .
तेच मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न .
धन्यवाद् !
आपला ,
लिंगूराम .



मित्रहो,

आपण मनापासून कधी मनाचा विचार केलाय.
सगळेच आपले मन मन करीत असतात. पण हे मन काय असते ? ते कोठे असते ? मनाशी आपले नाते काय आहे ? असे आणि अजुनही बरेच मनाविषयी प्रश्न मला बालपणापासूनच सतावतायत तसेच आपल्यालाही सतावतात का ?  मी याच माझ्या मनाबद्दल तुमच्याशी गप्पा मारणार आहे.

तसा माझा आणि मनाचा संबंध बराच लवकर आला. तुमचाही आला असेल.

लहानपणी, म्हणजे जेव्हा थोडं समजायला लागलं तेंव्हापासून आई नंतर माझा सोबती कोण असेल तर ते म्हणजे माझे मन.

लहानपणी तसा मी फार खोडकर होतो. पण हळवाही तेवढाच होतो. आजोळी जन्म झाल्यामुळे आजी-आजोबांकडेच बालपण गेल. आजोळी सगळ्यांच फार प्रेम मिळे. आईपेक्षा आजोबांच प्रेम जास्त त्यामुळे आजोळीच राहणे मी पसंत करी.

अगोदर उल्लेख केल्याप्रमाने मी खोडकर असल्यामुळे वाडीतल्या भटाच्या मुलाची मी खोड काढली. त्याने माझी तक्रार आजोबांजवळ केली. आजोबा तेंव्हा माझ्यावर फार रागावले. माझा पापा घेतला नाही, मला रात्री झोपताना गोष्ट सांगीतली नाही तसेच सकाळी माझ्याशी न बोलताच गुरे घेऊन शेतावर गेले. ही गोष्ट त्यावेळी मला म्हणजे माझ्या मनाला फार लागली. मी फार बेचैन झालो. तेंव्हा मी बालवाडीत जात असे. पण आजोबा माझ्याशी बोलत नाहीत या विचाराने मी शाळेतही गेलो नाही. आजोबांची न्याहरीला येण्याची वाट पहात राहीलो.  कधी त्यांच्या मांडीवर बसुन त्यांच्या पीकलेल्या बारीक दाढी असलेल्या गालावर गाल फीरवतो असे झाले होते.

आजोबा दुपारी शेतातून आले. मी त्यांची वाटच पहात होतो. त्यांना पाहून फार आनंद झाला. मी धावतच त्यांच्याकडे गेलो.

मला पाहून त्यांनी आजीला विचारले, "काय गो आज पपलो शाळेत नाय गेलो ? "
आजी म्हणाली, " तुम्ही तेचो मुको घेवक नाय, रात्री गोष्ट सांगाक नाय आणि सकाळी रोजसारख्या उठउक नाय ह्येचा त्येका वायट वाटला म्हणुन शाळेत जावक नाय. तुमची वाट बघीत रवलो हा ."


आजोबांनी हातपाय धुतले आणि मला मांडीवर घेउन खोड्या नको करु म्हणुन सांगीतले. माझा गोड पापा घेतला . मला फार आनंद झाला.

खरे तर मी त्या भटाच्या मुलाची पाटी फोडली होती. तेव्हा दगडाच्या पाट्या असत. माझ्यामुळे आजोबांना भटाचे बोलणे खावे लागले होते. कारण आजोबा माझे लाड करायचे आणि त्यांच्यामुळेच मी एवढा शेफारलो असे त्यांना म्हणाले.

आजोबांनी मला न मारता , माझ्या शरीराला शिक्षा नकरता माझ्याशी न बोलून माझ्या मनाला चांगली शिक्षा केली. आजीने, मामाने मला तेव्हा फार मारले पण त्याचे मला काहीच वाटले नव्हते, पण आजोबा माझ्याशी बोलले नाहीत याचे त्या बालमनाला फार वाईट वाटले.

आणी तेंव्हाच मला मन काय असते त्याची जाणीव झाली.

त्या दिवसापासून आजतगत हे मन माझे पक्के मित्र बनले आहे. कारण तेव्हा आजोबा माझ्याशी बोलले नाहीत याचा विचार करीत होतो आणि बोलत होतो , कुणाशी तर मनाशी !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

जणू तेव्हापासून मी आणि मन एकदम हाडाचे सोबती बनलोय.

माझेच नाही या जगात जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक मन असते आणि तेच शेवटपर्यंत त्याचे ते सखा, सोबती, मार्गदर्शक, गुरु आणि बरंच काही बनून राहतं.

या गोष्टीवर कुणाचाच विश्वास बसणार नाही, पण जीवनात घडणा-या प्रत्येक गोष्टीचा आपल्या त्या वेळेच्या वागण्याचा विचार केला तर हे लक्षात येईल की मनाचा आपल्या वागण्याशी कीती जवळचा संबंध होता ते.

कारण म्हणतात ना की "मन करा रे प्रसन्न, सर्व सिध्दीचे कारण ।।"

कारण या जगात मानव कींवा ईतर प्राणी जे काही वर्तन करतात त्यात मनाचा संबंध असतोच.

खरं की नाही थोडा विचार करा , मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, एकदा तुम्ही मनावर विजय मिळवलात की हे जीवन तुमचंच आहे.........................


*** लिंगूराम शापित



1 comment:

  1. लिंगुराम कारण मन हा मनातलाच राजा असतो....

    ReplyDelete